नवी दिल्ली –कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी एका व्हिडीओतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला. फकिराची जादू; झोळीतून विमानतळ काढला अन् अदानींच्या कब्जात दिला, असे ट्विटही राहुल यांनी त्या समवेत केले.
मोदी स्वत:चा उल्लेख बऱ्याचदा फकीर म्हणून करतात. त्याचा आधार घेऊन राहुल यांनी सोशल मीडियावरून पाच मिनिटांचा एक व्हिडीओ जारी केला. मोदी आणि अदानी यांच्यातील कथित मैत्रीचा संदर्भ देऊन राहुल यांनी व्हिडीओला मित्र-काल असे शीर्षक दिले. विमानतळे, बंदरे, रस्ते, संरक्षण दले, प्रसारमाध्यमे, कोळसा, ऊर्जा यांच्यासह संपूर्ण सरकारवरील नियंत्रणाची ही कथा आहे.
‘फ़क़ीर’ का जादू – झोले से एयरपोर्ट निकाला, अडानी के कब्ज़े में डाला!https://t.co/zuRqi2WJ0g pic.twitter.com/k3IpSFXHjv
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 20, 2023
मोदी-अदानी संबंध, देशाच्या संपत्तीची लूट याविषयी खरे तेच मी बोललो. मात्र, संसदेतील कामकाजातून माझी वक्तव्ये आणि सत्य वगळण्यात आले, असे राहुल यांनी म्हटले. अदानी यांनी अल्पावधीत घेतलेल्या भरारीविषयी त्यांनी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी उद्योग-व्यवसायांच्या विरोधात नाही. माझा विरोध मक्तेदारीला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.