पुणे – पाच वर्षांपेक्षा कमी प्रॅक्टीस असलेल्या ज्युनिअर वकिलांना पुणे बार असोसिएशनतर्फे अन्नधान्य आणि किराणा देण्यात येणार आहे. कुटुंबातील चौघांना एक महिना पुरेल एवढे धान्य आणि किराणा बारतर्फे देण्यात येणाऱ्या किटमध्ये असणार असल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक यांनी दिली.
एकूण वकिलांच्या तुलनेत ज्युनिअर वकिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. ज्युनिअर वकिलांना सुरूवातीच्या काळात प्रॅक्टीस करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सुरूवातीला त्यांना स्वत:ची फारशी कामे नसतात. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसाचा लॉकडाऊन पुकारला आहे. राज्यातील न्यायालये बंद आहेत. ज्युनिअर वकिलांना उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे ज्युनिअर वकिलांना किमान तीन महिने स्टायपेंड देण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनकडून ज्युनिअर वकिलांना अन्नधान्य आणि किराणा देण्यात येणार आहे. याविषयी अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक म्हणाले, दैनदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्य आणि किराण्याचे किट बारकडून बनविण्यात येणार आहे. गरजू वकिलांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत सुमारे 60 वकिलांनी संपर्क साधला आहे. पुढील सात दिवसात आणखी गरजू वकिलांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. चारशे ते पाचशे गरजू वकील होतील, असा अंदाज आहे. यासाठी 80 सिनिअर वकिलांनी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. ते प्रत्येकी 10 हजार रुपये देणार आहेत.