पालघर – पालघरमधील एका जिल्हा परिषद शाळेतील लाडक्या शिक्षकाची 14 वर्षांनी बदली झाली. शिक्षकाच्या बदलीमुळे संपूर्ण गाव भावूक झाला. साऱ्या गावाने एकत्र येत गुरुजींना निरोप दिला.
“तारपा’ वाद्याच्या गजरात गावकऱ्यांनी जड अंत:करणाने मिरवणूक काढली. यावेळी सरांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. या भावनिक घटनेच्या व्हिडीओची समाजमाध्यमात एकच चर्चा आहे. 14 वर्षांपासून अजित गोणते पालघर जिल्ह्यातील कासपाड्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करतात.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, क्रीडास्पर्धा व वकृत्व स्पर्धेतील तालुका, जिल्हा पातळीवरील विद्यार्थ्यांचे यश, शाळेच्या भौतिक सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल असे विविध उपक्रम राबवून प्रत्येक पालक आणि ग्रामस्थांच्या मनात त्यांनी घर केले होते. दरम्यान, शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये अजित सरांची जिल्हाअंतर्गत आणि आंतरजिल्हा अशी दोन्ही ठिकाणी बदली झाली. यावेळी कारसपाड्यातील ग्रामस्थांनी सरांना भावनिक निरोप दिला.
सरांना निरोप देण्यासाठी गावातील सारेच जमले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पालक, विद्यार्थी सरांभोवती जमले. तारपाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. “आमचे आदर्श शिक्षक आमचा अभिमान’ असे पोस्टर लावून गावातील महिलांनी आरती ओवाळत सरांना निरोप दिला. यावेळी विद्यार्थी, पालक ग्रामस्थांचे प्रेम पाहून सरांनाही अश्रू अनावर झाले.
कामाची पोचपावती
पुण्यात शिक्षण झालेले अजित गोणते यांनी ऐन पस्तीशीत ग्रामीण भागाचा कसलाही संबंध नसताना पालघरमधील आदिवासी भागात शिक्षक म्हणून नोकरी स्विकारली. चौदा वर्षे काम केल्यानंतर गावकऱ्यांनी सरांना दिलेल्या निरोपानंतर सरांना त्यांच्या कामाची पोचपावती मिळाली.