नागपूर : राज्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार होत आहे. नागपूरातही दिवसेंदिवस नवीन करोनाबाधितांची संख्या वाढतीच असल्याचे दिसते. काही दिवसांवर होळी सण आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरातील लाॅकडाऊन 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आला असून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याबाबत पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी माहिती दिलीय.
याआधी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लाॅकडाऊन लावण्यात आले होते. लाॅकडाऊन लागू असतानाही करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या 3 हजाराच्या पुढे सरकल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. 20) पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांसोबतही चर्चा करण्यात आली असून 31 मार्चपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात येत आहे, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे.
नागपुरात झपाट्याने करोनारुग्णसंख्या वाढत असल्याने हा करोनाचा नवा स्ट्रेन तर नाही ना, याची खात्री करण्यासाठी नमुने दिल्लीला पाठवले आहेत. त्याचे अहवाल येणे बाकी आहे. अहवाल प्राप्त झाल्यावरच याबाबत स्पष्ट सांगता येईल, असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी लसीकरणावर कोणताही परिणाम होणार नसून जिल्ह्यात 6 लाख 78 हजार लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नवीन निर्बंधानुसार, भाजीपाल, धान्य दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. ऑनलाइन रेस्टाॅरंट सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार. हा लाॅकडाऊन नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात वाढविण्यात आला आहे. ग्रामीनमधील जिते रुग्णसंख्या कमी आहे अशा, उमरेड, भिवापूर, आणि कुही तालुक्यात दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. तर इतर तालुक्यात दुकाने सायंकाळी 6 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहे.
दरम्यान, आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण लाॅकडाऊनला यावेळी हरकत घेतली. जर संपूर्ण लाॅकडाऊन केले तर गरिबांचं मोठं नुकसान होते, अनेकांचे रोजगार जातात, असे मुद्दे त्यांनी बैठकीत मांडले. नियम कडक करावेत असे फडणवीस यांनी सुचविले.