पुणे – पत्नीशी अश्लील वर्तन केल्याने तरुणाचा खून करणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली होती. कोणतेही धागेदोरे नसताना बंडगार्डन पोलिसांनी प्रकरणाचा उलगडा केला.
सूजरज आगवान (35, कानपूर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दि. 13 जून रोजी रेल्वे वसाहतीजवळ ही घटना घडली होती. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. तपासात बंडगार्डन पोलिसांना कोणतेही धागेदोरे मिळाले नव्हते. पोलिसांनी मालधक्का चौक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. यात एका मद्य विक्री दुकानाजवळ महिला आणि तरुण बोलत थांबल्याचे दिसले होते. पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. दि. 14 जून रोजी महिलेचा ठावठिकाणा समजला.
तिची चौकशी केली असता, चौकशीत खून झालेल्या तरुणाने महिलेशी अश्लील वर्तन केले होते. त्यानंतर महिलेच्या पतीने हा खून केल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिसांनी आरोपी सूरज आगवानला पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक संदीप मधाळे, रवींद्र गावडे, ज्ञानेश्वर गायकवाड, विलास केकाण, शरद ढाकणे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, अनिल कुसाळकर, किरण तळेकर आदींनी ही कारवाई केली.