नवी दिल्ली – भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मुकेश अंबानी यांना 2029 पर्यंत कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ देण्यासाठी भागधारकांची मंजुरी मागितली आहे. दरम्यान, या कालावधीत त्यांनी शून्य वेतनाचा पर्याय निवडला आहे.
मुकेश अंबानी हे 66 वर्षीय आहेत. कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वयाची सत्तरी ओलांडत असेल तर त्यांची नियुक्ती करण्यासाठी भागधारकांच्या विशेष ठरावाची आवश्यकता आहे. त्यामुळेच एका विशेष ठरावात, रिलायन्सने एप्रिल 2029 पर्यंत मुकेश अंबानी यांना कंपनीचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यासाठी भागधारकांची परवानगी मागितली आहे.
मुकेश अंबानी हे 1977 पासून रिलायन्सच्या संचालक मंडळावर आहेत आणि जुलै 2002 मध्ये त्यांचे वडील आणि समूहाचे कुलप्रमुख धिरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांना कंपनीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. शेअर होल्डर्सना पाठवण्यात आलेल्या विशेष ठरावात, रिलायन्सने म्हटले आहे की त्यांच्या संचालक मंडळाने 21 जुलै 2023 रोजी मुकेश अंबानी यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती त्यांच्या सध्याच्या कार्यकाळाच्या समाप्तीपासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजे 19 एप्रिल 2024 पासून प्रभावी राहील.
मुकेश अंबानी यांनी त्यांचे वार्षिक मानधन 15 कोटी रुपये इतके मान्य केले आहे. त्यानंतर कोव्हिड कालखंडानंतर त्यांनी आपले मानधन घेणे बंद केले आहे. त्यामुळे या मुदतवाढीदरम्यानही ते शून्य वेतन तत्त्वावर कंपनीचे प्रमुख राहतील.