लातूर – लातूरच्या निलंगा-औसा मार्गावर कार उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. तसेच अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ निलंगा-औसा मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. अपघातातील जखमींना लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व अपघातग्रस्त एकाच कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रकाश कांबळे (वय 27), अमर बडुरकर (15), जय बडुरकर (10) आणि अंश बडुरकर (10) अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताबाबत पोलिसांनी सांगितले की, सचिन बडुरकर हे नातेवाईकांच्या लग्नासाठी पुण्यात आले होते. हा लग्न सोहळा आटोपून ते निलंग्याकडे निघाले होते. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास निलंगा-औसा मार्गावरील उत्का पाटी या भागात सचिन बडुरकर यांची कार अचानक उलटली.
यामध्ये सचिन बडुरकर यांची दोन मुले अमर व जय, पुतण्या अंश बडुरकर आणि मेव्हणा प्रकाश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचे प्राथमिक तपासात समजते. दरम्यान, अपघातामध्ये तीन जण जखमी झाले असून त्यात स्वत: सचिन बडुरकर, त्यांच्या पत्नी आणि आणखीन एका व्यक्तीचा समावेश आहे. या तिघांवर लातूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.