अहमदाबाद – IPL 2023चा पहिला सामना 31 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या काही ओव्हरमध्ये CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या जोरदार फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. याचबरोबर धोनीने आपले आयपीएलमध्ये 200 षटकार पूर्ण केले आहेत.
पण हा आनंद चाहत्यांच्या चेहऱ्यावर जास्त काळ टिकला नाही. त्याचे कारण म्हणजे, गुजरात टायटन्सची इनिंग सुरु असताना शेवटच्या ओव्हरमध्ये डायव्हिंग करताना धोनी जखमी झाला आहे. जो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याच घटनेपाठोपाठ CSKचा पराभव झाल्यामुळे चाहत्यांबरोबरच संपूर्ण संघात नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.
धोनीच्या दुखापतीवर चाहत्यांनी व्यक्त केले मत –
”त्याला जास्त दुखापत होणं योग्य नाही, कारण CSKसाठी धोनीने प्रत्येक सामना खेळणे खूप महत्वाचे आहे. तो संघाचा कर्णधार असून उत्तम फिनिशर देखील आहे. त्याची प्रत्येक भूमिका संघासाठी महत्वाची ठरते”, असे मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे.
गुजरात टायटन्सने ५ गडी राखून मिळवला विजय –
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य निर्णय ठरला. प्रथम फलंदाजी करताना CSK संघाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 178 धावा केल्या आणि 179 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने शेवटचे 4 चेंडू शिल्लक ठेवत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.