बीड – धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे (दि.13 मंगळवारी) सांयकाळी साडेसहाच्या दरम्यान इन्स्टा स्टार संतोष मुंडे यांच्यासह मित्र बाबुराव मुंडे यांचा वीजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संतोष मुंडे व त्यांचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी ते काळेचीवाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विज आल्यामुळे दोघांचा विजेचा धक्का लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष मुंडे यांना दोन लहान मुली आणि एक मुलगा आहे. संतोष यांच्या अचानक मृत्यूने पत्नीसह चिमुकली पोरंही पोरकी झाली आहे.
दरम्यान, महावितरणच्या गलथाण कारभारामुळेच या दोघांचा जीव गेला असून यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. मात्र महावितरणने योग्य कारवाई करु, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन संतोष आणि बाबुराव मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर घटनेबाबत विविध स्तरातून तीव्र दुखः व्यक्त केले जात आहे. संतोष मुंडे हा तरूण अतिशय गरीब घरातील होता. मात्र टीकटाॅक या समाजमाध्यमावर त्यांनी आपल्या गावठी शैलीत विनोदी व्हिडीओ तयार करून मोठी प्रसिद्धी मिळवली होती. टीकटाॅक आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फाॅलोवर्स होते. त्यांचे व्हिडीओ हे वेगळे असल्याने ते अनेकांना खुप आवडत असत. त्यांच्या कुटुंबियांसह चाहत्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.