वेलिंग्टन :– न्यूझीलंडमध्ये 2008 सालानंतर जन्म झालेल्या व्यक्तींना आजीवन धुम्रपानास बंदी घालणारा कायदा करण्यात आला आहे. मंगळवारी या कायद्याच्या विधेयकाला संसदेत मंजूरी देण्यात आली. आरोग्य मंत्री आयेषा वेराल यांनी हे विधेयक संसदेत मांडले होते. धूरविरहीत पर्यावरण आणि नियमन कायद्यात दुरुस्ती करून हा कायदा करण्यात आला आहे.
या कायद्यामुळे हजारो लोक दीर्घकाळासाठी आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतील. धुम्रपानामुळे होणारे रोग न झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर होणारा 5 अब्ज न्यूझीलंड डॉलर (अंदाजे 26 हजार कोटी रुपये) इतका खर्च देखील वाचणार आहे, असेही वेराल यांनी सांगितले.
या कायद्याशिवाय सिगारेटमधील निकोटीनचे प्रमाण कमी करण्याची तरतूददेखील करण्यात आली आहे. किरकोळ विक्रेत्यांची संख्या देखील 6 हजारांवरून 600 पर्यंत कमी करण्यात आली आहे. न्यूझीलंडला 2025 पर्यंत धूर विरहीत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून हा कायदा करण्यात आला आहे. न्यूझीलंडमधील प्रौढांमध्ये धुम्रपानाचे प्रमाण अत्यल्प आहे, असे ऑर्गनायजेशन ऑफ इकॉनॉमिक कोऑपरेशन ऍन्ड डेव्हलपमेंट या 38 देशांच्या आंतरसरकारी पातळीवरील संघटनेने म्हटले आहे.
Bihar : ‘दारूबंदी’च्या निर्णयाच्या फेरविचाराची BJP नेत्यांचीच मागणी
या कायद्यामुळे लहान उद्योगांवर विपरीत परिणाम होईल. तसेच यामुळे बेकायदेशीरपणे सिगारेटच्या विक्री होण्यात वाढ होईल, असे न्यूझीलंडमधील विरोधी पक्षांनी म्हटले आहे.