इस्लामपूर (विनोद मोहिते) – शहर शिवसेना प्रमुख नगरसेवक शकील सय्यद यांनी कार्यकर्त्यांसह शासकीय धान्य गोदामात धाव घेत कारभाराचा पंचनामा केला. वाळवा तालुका पुरवठा विभागाचा सावळागोंधळ शिवसेनेकडून चव्हाट्यावर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.भोंगळ कारभाराचा शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला.
आज मंगळवारी हा प्रकार घडला. तेव्हा एकही शासकीय अधिकारी गोदामात उपस्थित नव्हता. या प्रकारानंतर थेट तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी स्वतः शिवसेना शहर प्रमुख शकील सय्यद यांना संपर्क साधला. कार्यालयीन कामानिमित्ताने मुंबईत आहे.तुम्ही जिथे आहात त्या गोदामात सक्षम अधिकारी ताबडतोब येतील असा निरोप धाडला. पण त्यांच्या आदेशालाही पुरवठा विभागाने वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचे श्री. सय्यद यांनी सांगितले.
ते म्हणाले,” शिवसैनिक गोदामात आल्याची माहिती लागताच एक कोतवाल घटनास्थळी आले. त्यांना गोदामातील रेकॉर्ड बाबतीत विचारणा केली असता अपेक्षित उत्तरे देता आली नाहीत. गोदामाच्या मागे एक दोन मोठे ट्रक, दोन ४०७ गाड्यामध्ये धान्य भरले जात होते. धान्य भरून आवारातून बाहेर पडणाऱ्या ट्रक चालकालाही धान्य कोठे निघाले आहे ? याबाबत ठाम सांगता आले नाही. संबंधित माल बोरगांवच्या तीन दुकानात जात असल्याचे उपस्थित कोतवाल यांनी सांगितले. त्याची पावती मागितली असता एका साध्या कागदावर १७८ पोती असल्याचे लिहलेले दाखवले. ”
यावेळी सुर्यकांत पाटील ,शिवाजी शिदें,अशोक चव्हाण,ललित तुळसणकर,अहमंद शेख ,तुषार खंडागंळे,धोडींराम महाराज, विष्णु पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.
तहसिलदारांचा आदेश अन् तासाभरात कर्मचारी आले
तहसिलदार श्री. सबनीस यांनी शासकीय धान्य गोदामात सक्षम अधिकारी, कर्मचारी पाठवतो असे श्री सय्यद यांना संपर्क साधून सांगितले. पण साहेबांनी आदेश दिल्यानंतर ही तासाभरात कर्मचारी आले. तेही सेवानिवृत्त गोडाऊन किपर आणि अव्वल कारकून. यावेळी कारकून पवार यांनी इस्लामपूर आणि आष्टा शहरात दोन गोदाम असल्याची माहिती दिली. १४५ रेशन दुकानांचा स्टाँक असल्याचे सांगितले. पण सय्यद यांनी अन्य प्रश्नाचा भडीमार केल्यावर त्यांना समाधान कारक उत्तरे देता आली नाहीत.
…तर आंदोलन तीव्र करणार
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रसिध्द केल्याप्रमाणे ब गटातील सर्व शिधापत्रिका धारकांना सरसकट धान्य मिळावे. सवलतीच्या दरात आपण जे धान्य देणार आहात.ते किमान प्रत्येक शिधापत्रिकेला पाच किलो गहु आणि पाच किलो तांदुळ द्यावा अशी मागणी आहे. मागणी मान्य न झाल्यास या पुढे ही हे आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा शकिल सय्यद यांनी दिला आहे.