बारामती – अजित पवार यांच्या भाषणावेळी एका कार्यकर्त्याने काऱ्हाटीच्या शाळेत जायला बस सुरु करा, अशी मागणी केली. कार्यकर्त्याची ही मागणी ऐकल्यानंतर ड्रायव्हर म्हणून मी बसतो, साहेबांना कंडक्टर ठेवतो, सुप्रियाला तिकीट काढायला लावतो, अशी फटकेबाजी ग्रामस्थांना उद्देशून अजित पवार यांनी केली.
पुणे जिल्हा परिषद आणि नाम फाऊंडेशनच्या वतीने बारामती तालुक्यातील भिलारवाडीत पाझर तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पवारांनी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली. पवार यांच्या भाषणावेळी एका कार्यकर्त्याने काऱ्हाटीच्या शाळेत जायला बस सुरु करा, अशी मागणी केली.
कार्यकर्त्याची ही मागणी ऐकल्यानंतर पवारांनी ग्रामस्थांना उद्देशून टोलेबाजी केली. ड्रायव्हर म्हणून मी बसतो. साहेबांना (शरद पवार) कंडक्टर ठेवतो. आणि सुप्रियाला तिकीट काढायला लावतो. अरे आधीची परिस्थिती बघा. आता परिस्थिती बदलत आहे. जेव्हा शरद पवार पुण्यात असायचे. तेव्हा बारामतीहून डबा जायचा. डबा जाईपर्यंत खराब व्हायचा. आता परिस्थिती तशी नाहीय. विकास झाला. जरा फलटण, दौंड, इंदापूर, फलटणला जाऊन या आणि तिथली परिस्थिती बघा, असं पवार यावेळी म्हणाले.
झाकली मूठ सव्वा लाखांची…
बारामतीत किती निधी आला ते बघा. किती निधी आला मी सांगत नाही हे चॅनलवाले लगेच दाखवतील ब्रेकिंग न्यूज म्हणून, असं अजित पवार म्हणाले. यावेळी मधेच एक ग्रामस्थ किती निधी आला ते सांगत होता. तेवढ्यात अजित पवार बोलले तू गप्प बस ना बाबा! झाकली मूठ सव्वा लाखाची, राहुदेत ना!, असं पवार यांनी मिश्किलपणे म्हटल्यावर कार्यक्रमस्थळी उपस्थितांत हशा पिकला.