मुंबई – महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निशाण्यावर आज विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार होते. पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून दिलेल्या कोपरखळ्यांचा आज मुख्यमंत्र्यानी हिशोब लावला. त्याचं झालं असं की, बारावीच्या पेपरफुटीच्या विषयावरून विरोधीपक्ष नेते पवार यांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडलं. अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना शिंदे यांनी अनेक राजकीय कोपरखळ्या देखील मारल्या.
पहाटेच्या शपथविधीचा आठवण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीचा आठवण करून दिली. पहाटेचा शपथविधी आमच्यासाठी मोठा शॉक होता असेही ते म्हणाले. “सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून आम्हाला धक्का बसला राज्यपाल कोश्यारीही अवाक् झाले असंही अजितदादा भाषणात म्हणाले. पण, तुम्ही २०१९ मध्ये साखर झोपेत शपथ घेतली. मी तेव्हा सकाळी टीव्ही लावली तेव्हा धक्का बसला. तो खरा आमच्यासाठी मोठा शॉक होता त्यातील अनेक कथा देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितल्या आहेत,” अशी टोलेबाजी मुख्यमंत्र्यानी केली.
अजित पवार की जयंत पाटील
दरम्यान, मुख्यमंत्र्यानी सभागृहात बोलताना आज मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील व अजित पवार यांच्यात स्पर्धा असल्याचे सूचित केले. आपल्या वक्तव्याच्या पुराव्यादाखल त्यांनी अजित पवार व जयंत पाटील यांच्या समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याचे सांगितले. तसेच आधी मुख्यमंत्री कोण होणार हे आपापसात ठरवून घ्या असा उपरोधिक सल्ला देखील दिला.
अजित पवारांना पोटदुखी, आमच्याकडे जालीम इलाज
“अजितदादा तुम्ही गोड बोलता पण तुमचा कार्यक्रम सुरू असतो. अशी पोटदुखी सुरू राहुदे, यासाठी आम्ही जालीम औषध ठेवले आहे. यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे.” असेही मुख्यमंत्री म्हणाले.