बंगळुरू – कर्नाटक सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उद्या बुधवारी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली. आज संध्याकाळपर्यंत नवीन मंत्र्यांची यादी जाहीर केली जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळात सात नवीन मंत्री समाविष्ट केले जाणार आहेत. तथापि विद्यमान मंत्र्यांपैकी कोणाला वगळले जाणार आहे किंवा कसे याबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी गुप्तताच पाळणे पसंत केले आहे. उद्या सायंकाळी 4 वाजता नवीन मंत्र्यांचा शपथविधी होईल असेही त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर विविध वाहिन्यांवर संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी प्रसारीत केली गेली आहे. तथापि ही यादी म्हणजे केवळ अदांज असून असे अंदाज वर्तवणे प्रसार माध्यमांनी थांबवावे त्यांना सायंकाळपर्यंत नवीन मंत्र्यांची यादी दिली जाईल असेही त्यांनी नमूद केले. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नढ्ढा व भाजपचे प्रभारी अरूण सिंह यांनाही या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.