राम मंदिरासाठी आता कॉंग्रेसचेही निधी संकलन; राजीवजींचे ‘स्वप्न’ पूर्ण करण्याचे आवाहन

भोपाळ – राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर भाजप आणि हिंदुत्वादी संघटनांनी निधी उभारणीसाठी मोहीम हाती घेतली असताना कॉंग्रेसनेसुद्धा निधी उभारणीच्या कार्यक्रमात स्वतंत्रपणे उडी घेतली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राम मंदिर उभारणीसाठी जमेल तेवढा निधी देण्याची विनंती करणारे पोस्टर्स राजीव गाधींच्या फोटोसह झळकले आहेत.

भारतीय जनता पार्टी आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिरासाठी निधी जमवणे सुरु केले आहे. त्यासाठी देशभरात विशेष मोहीम राबवली जाते आहे. त्यानंतर आता कॉंग्रेससुद्धा राम मंदिरासाठी स्वतंत्रपणे निधी उभारत आहे.

मध्य प्रदेशमध्ये त्या आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या जवळचे म्हटले जाणारे आमदार पी. सी. शर्मा यांनी निधी उभारणी सुरु केली आहे. त्यांनी भोपाळमध्ये तशा आशयाचे पोस्टर्स लावले असून त्यामध्ये राम मंदिराची निर्मिती करणे हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्वप्न होते. त्यासाठी आपण निधी द्यावा असं लिहिलेलं आहे.

भोपाळमधील न्यू मार्केटमधील हनुमान मंदिरासमोरशर्मा यांनी राम मंदिरासाठी निधी संकलनाचे काम सुरु केले आहे. यासाठी त्यांनी राजीव गांधी यांचा 1989 मधील फोटोचा वापर केलाय. या फोटोमध्ये 1989 साली राजीव गांधी अयोध्या येथील राम मंदिराचे भूमिपूजन करताना दिसत आहेत. पोस्टरमध्ये राम मंदिर ट्रस्टचा बॅंक अकाऊंट नंबरसुद्धा दिलेला आहे. या अकाऊंटमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी निधी द्यावा असे आवाहन केले आहे.

दरम्यान, यापूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीसुद्धा राम मंदिर निर्माणाचे स्वागत केले आहे. त्यांच्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीसुद्धा राम मंदिर निर्माणाचे स्वागत करत राजीव गांधींची अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याची इच्छा होती, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी जमा करण्याचे काम सुरु केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.