अकोले – भंडारदरा परिसरात काजवे पाहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला अकोलेतील नवलेवाडी फाट्याजवळ अपघात होऊन पुण्यातील रेखा तुषार लाहोटी (वय 41) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर उर्वरित तिघांवर संगमनेर येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुण्याला हलविण्यात आले.
संगमनेर येथे गेट टुगेदर झाल्यानंतर लाहोटी परिवार व त्यांचे नातेवाईक सर्व जण 6 कारमध्ये भंडारदरा परिसरात काजवा महोत्सवचा आनंद घेण्यासाठी गेले होते. काजव्यांचे मनोहरी दृश्य पाहून संगमनेरकडे परतत होते. पहाटे 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान नवलेवाडी फाटा (अकोले) येथे पुण्यातील मुकुंदनगर येथील रहिवासी तुषार लाहोटी, रेखा लाहोटी, शिवप्रसाद लाहोटी व तन्वी लाहोटी हे चौघे टाटा हॅरीअर कार (एम एच 12 एस यु 8882) मधून प्रवास करत होते.
या गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी जोरात झाडावर आदळून झालेल्या अपघातात रेखा लाहोटी यांचे जागेवर निधन झाले. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरीक मदतीला धावले. त्यांच्यासोबत असलेल्या गाड्यातील नातेवाईक मदतीसाठी थांबले. लाहोटी यांची प्राणज्योत जागेवरच मालवली होती तर अन्य तिघांना गाडी बाहेर काढण्यात नातेवाईक व नागरिकांना यश आले.
तुषार लाहोटी, शिवप्रसाद लाहोटी व तन्वी लाहोटी या तिघांवर सुरूवातीला अकोले येथे व नंतर संगमनेर येथे उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. ते सध्या मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सकाळी मयत रेखा लाहोटी यांचे शवविच्छेदन घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.