नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरुद्ध दिल्ली येथे भारतीय कुस्तीपटूंनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. परंतु आद्यपही ब्रृजभूषणसिंग यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. 29 मे रोजी भारताच्या नवीन संसदेचे उदघाटन झाले. याच दिवशी आंदोलनकर्त्या खेळाडूंनी नवीन संसद भवनाच्या आवारात महिला पंचायत भरवण्याचा प्रयन्त केला होता.
परंतु पोलीसांकडून त्यांची अडवणूक करण्यात आली. आपल्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव लौकिक मिळवून देणारे कुस्तीपटू दिल्लीच्या रस्त्यावर ठाण मांडून आहेत. कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांनी तसेच मोठमोठ्या खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला आहे.
अशातच काल (दि. 2) शुक्रवारी भारताच्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाने कुस्तीगिरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊ नका, अशी विनंती त्यांनी मल्लांना केली. दरम्यान, आता या संबंधात क्रिकेटपटूंनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
काय म्हंटलं आहे? पत्रकात….
“चॅम्पियन कुस्तीगिरांचे आंदोलन ज्या पद्धतीने हाताळले गेले, ती दृष्य पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. मेहनतीने मिळवलेली पदके हे खेळाडू गंगेत विसर्जित करायला जात होते, हे ऐकून आम्हाला चिंता वाटली. त्या पदकांमध्ये या मल्लांचे अनेक वर्षांचे प्रयत्न, त्याग, दृढनिश्चय आणि धैर्य यांचा समावेश आहे.
या पदकांमध्ये केवळ मल्लांचा नाही, तर देशाचा अभिमान आणि आनंद आहे. या प्रकरणात मल्लांनी कुठलाही वादग्रस्त निर्णय घेऊ नये, अशी आमची त्यांना विनंती आहे. आशा आहे, त्यांचे प्रश्न सोडवले जातील. कायद्यानुसार सारे काही योग्य होईल.” असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात सुनील गावसकर, के. श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा, संदीप पाटील, कपिलदेव, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, मदन लाल, सय्यद किरमाणी, बलविंदर संधू यांचा समावेश होता.