पुणे – मराठी चित्रपटसृष्टीतील देखणे अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बाॅलिवूड, राजकीय नेते मंडळींसह राज्यभरातून त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. शुक्रवारी (दि. 14) रात्री त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली होती. पुण्यातील तळेगाव आंबी एमआयडीसी येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. महाजनी यांचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला पण कोणालाही याची माहिती मिळाली नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू आहे. त्यांनाही महाजनी यांच्या मृत्यूची माहिती दोन दिवसानंतर मिळाली. याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, महाजनी यांचा शेवटचा फोटो समोर आला आहे.
ज्यावेळी घरातून दुर्गंधी येत आहे असे समजताच पोलिसांना बोलावण्यात आले आणि घराचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. दोन दिवसांपासून मृतदेह पडून असल्यामुळे शरीर, चेहरा काळा पडला होता. त्यांनी पिवळ्या रंगाचं टी-शर्ट घातले होते. त्यांच्या मृतदेहा शेजारी प्रोटीनचा डब्बा दिसत आहे. रविंद्र महाजनी बेडच्या खाली, डोक्यावर पडले आहेत. याशिवाय शेजारी काळ्या रंगाचं ऑइलही दिसत आहे. नेमके त्यांच्या शेजारी असलेल्या काळ्या रंगाचं द्रव्य काय आहे हे समजू शकलेले नाही. याचा तपास सुरू आहे. रवींद्र महाजनी हे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एकटेच राहत होते. त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. लोकप्रिय अभिनेत्याची ही अवस्था पाहून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र महाजनी पुण्यातील तळेगाव दाभाडे भागात मागील 8-9 महिन्यांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी घराचा दरवाजा उघडला नव्हता. घरातून उग्र वास येऊ लागल्याने दार उघडण्यात आले तेव्हा ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रविंद्र महाजनी यांना रुग्णालयात दाखल केले. तेव्हा ते मृत असल्याचे घोषित करण्यात आले.
रवींद्र महाजनी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘देवता’, ‘आराम हराम आहे’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘बेलभंडार’ अशा सुपरहिट सिनेमांत त्यांनी काम केलं. 70 ते 90चा काळ त्यांनी गाजवला. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीही लोकप्रिय अभिनेता आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या सिनेमात रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटातून या बाप लेकाची जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली होती. त्याचप्रमाणे देऊळ बंद या मराठी सिनेमातही त्या दोघांनी एकत्र काम केले होते. महाजनी यांना मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा पसरली आहे.