दुबई – डेरील मिचेलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंड संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश करताना वनडे क्रिकेट विश्चचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीतील पराभवाचा इंग्लंडचा हिशोब चुकता केला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाने निर्धारीत २० षटकांत ४ गडी बाद १६६ धावा केल्या. प्रत्युत्तर न्यूझीलंडने १९ षटकांत ५ बाद १६७ धावा करून विजयाची नोंद केली. डेरील मिचेलने सर्वाधिक नाबाद ७२ धावा केल्या. तर डेव्होन कॉन्वेने ४६ धावांचे योगदान दिले. या पराभवाने इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
तत्पूर्वी मोईन अलीचे अर्धशतक व डेव्हीड मलानची उपयुक्त खेळी यांच्या जोरावर इंग्लंडने आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या उपांत्य लढतीत 4 गडी गमावून 166 धावा केल्या.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या दुखापतग्रस्त जेसन रॉयच्या अनुपस्थितीत जॉनी बेअरस्टोने जोस बटलरसह डावाची सुरुवात केली. बेअरस्टो आक्रमक फलंदाजी करत होता.
या जोडीने 37 धावांची सलामी दिली. मात्र, त्याचवेळी अनावश्यक फटका मारून बेअरस्टो 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर बटलरनेही धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात आपली विकेट बहाल केली. त्याने 29 धावांची खेळी करताना डेव्हीड मलानसह संघाचे अर्धशतक फलकावर लावले.