जिनेव्हा – करोनावरील उपचारांसाठी नव्या औषधाला मान्यता देण्यात आली आहे. एलि लिली आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाईन यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या बारिसिटिनिब या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. ओल्युमियांट या नावाने हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार ओमायक्रॉनचा आता जगभरातील देशांमध्ये प्रसार झाला आहे. अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन वेगाने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेऊ लागला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेथील सरकारांनी बुस्टर डोस, टेस्टिंग आणि उपचारांमध्ये वाढ केली आहे. याच पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञ समितीने लिलिच्या बॅरिसिटिनिब औषधाला मान्यता दिली आहे.
या नावाखाली उपलब्ध असलेले हे औषध करोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाच देता येऊ शकेल. तसेच, कॉर्टिकोस्टेरॉईडसोबतच हे औषध देता येऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देतानाच आवश्यक त्या नियमावली देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.