बॅंकॉक – म्यानमार सैन्याकडून त्यांच्या जमिनीवरुन भारतविरोधी बंडखोर कारवाया करणाऱ्या गटांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये छावणी उभारुन भारतविरोधी कारवाया करणाऱ्या बंडखोर गटांवर म्यानमारच्या लष्कराने सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी पिपल्स लिबरेशन आर्मीकडून (पीएलए) आसाम रायफल्सचे कर्नल आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पीएलए आणि अन्य दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी भारतीय यंत्रणा म्यानमारमधील यंत्रणांच्या संपर्कात आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे भारतीय लष्करदेखील म्यानमारमधील लष्कराच्या संपर्कात असून नुकतंच भारताविरोधी बंडखोरांना भारतीय यंत्रणांकडे सोपवण्यात आले आहे. विशेष विमानाने या पाच जणांना आणण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. या बंडविरोधी गटांमुळे किती जणांना जीव गमवावा लागला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. गतवर्षी 13 नोव्हेंबरला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. यामध्ये आसाम रायफल्सच्या कमांडिंग अधिकाऱ्याचा समावेश होता.