चंडीगढ -पंजाबमधील एका गावात शुक्रवारी पोलिसांनी 5 किलो आयईडी स्फोटके जप्त केली. ती कारवाई भारत-पाकिस्तान सीमेलगत करण्यात आली. त्या स्फोटकांची तस्करी पाकिस्तानमधून करण्यात आल्याचे समजते.
आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळच असणाऱ्या अमृतसर जिल्ह्यातील एका गावात स्फोटके आणि अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांच्या विशेष कृती दलाने शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी एका रस्त्यालगत संशयास्पद पिशवी आढळली. त्या पिशवीत स्फोटके ठेवण्यात आली होती.
त्याशिवाय, पिशवीत भारतीय चलनातील नोटाही आढळल्या. त्यांचे एकूण मूल्य 1 लाख रूपये आहे. स्फोटके आढळल्यानंतर तातडीने बॉम्बनाशक पथकाला पाचारण करण्यात आले. त्या पथकाने स्फोटके निकामी केली. पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात नुकतीच 2.5 किलो आरडीएक्स स्फोटके जप्त करण्यात आली. त्यापाठोपाठ त्या राज्यात आयईडी स्फोटके सापडल्याने सुरक्षाविषयक चिंता वाढली आहे.
पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचा कट देशविरोधी घटकांनी रचल्याचे ताज्या घडामोडींतून सूचित होत आहे. पंजाब पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दहशतवादी जाळे उघडकीस आणले. त्याप्रकरणी आयएसवायएफच्या सहा सदस्यांना अटक करण्यात आली. त्या संघटनेचे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी लागेबांधे असल्याचा संशय आहे.