नवी दिल्ली – भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला. पुढील लष्करप्रमुख बनण्याचा मान त्यांना मिळण्याची शक्यता आहे. लष्कराचे याआधीचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सी.पी.मोहंती सोमवारी सेवानिवृत्त झाले.
त्यांची जागा पांडे यांनी घेतली. याआधी ते लष्कराच्या पूर्व कमानचे प्रमुखपद सांभाळत होते. आता ते पद लेफ्टनंट जनरल आर.पी.कलिता सांभाळतील. विद्यमान लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे एप्रिलमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.
त्यावेळी पांडे लष्करातील सर्वांत वरिष्ठ अधिकारी ठरतील. प्रथेनुसार, लष्करप्रमुखपदी सर्वांत वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. त्यामुळे पुढील लष्करप्रमुख बनण्याचा मान पांडे यांना मिळू शकतो. उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना आतापर्यंत परम विशिष्ट सेवा पदक आणि इतर सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.