हडपसर (विवेकानंद काटमोरे ) – महापालिकेच्या मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ५८ प्रभागांचा प्रारूप रचनेचा आराखडा आज जाहीर करण्यात आला.हडपसर विधानसभा मतदार संघात नव्या प्रभागांमुळे विद्यमान नगरसेवक व इच्छुक कार्यकर्ते गोंधळात पडले असून, आपला परिसर कोणत्या प्रभागात समाविष्ट झाला, संलग्न भाग कोणता, हे शोधण्यातच त्यांचा आज दिवस निघून गेला.
महापालिकेची निवडणूक मार्च २०२२ मध्ये होणार आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार तीनसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यासाठी आज ५८ प्रभागांचा प्रारूप आराखडा घोषित करण्यात आला.त्यामध्ये हडपसर विधानसभा मतदार संघात असलेल्या पूर्वीच्या ११ प्रभागांचा समावेश नव्या १४ प्रभागांत झाला आहे. त्यामुळे काही विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग नाहीसे होऊन नवीन भाग जोडला गेला आहे. काही नगरसेवकांना अपेक्षित भाग जोडला गेल्याने हायसे वाटत असून, काहींची अडचण झाली आहे.
महापालिकेची निवडणूक आपला ‘वट’ असलेल्या भागावर अवलंबून असते. त्यामुळे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक कार्यकर्ते आपल्या प्रभागाला नेमका कोणता भाग जोडून आला, कोणता भाग तुटला? हे शोधत होते. आता कोणत्या भागात कोणत्या धर्माची व जातीची मते किती मते असणार? त्या भागात कोणत्या पक्षाचा राजकीय कार्यकर्ता खंबीर आहे, वजनदार व्यक्ती आणि पुढाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. प्रभागाचे आरक्षण व नकाशा पाहून नियोजन लावले जात आहे.
नव्या काही प्रभागांत एकापेक्षा अधिक दावेदार असलेल्या नगरसेवकांत नाराजी आहे. काही नगरसेवकांचे प्रभाग अदृश्य झाल्यासारखी स्थिती असून, त्यांचा हक्काचा परिसर दुसऱ्याच कुठल्या तरी प्रभागाला जोडल्याने त्यांची चिडचीड आणि चिंता वाढली आहे.