नवी दिल्ली – मंदिर-मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत देशातील शंभर वर्षांहून अधिक जुन्या मशिदींचे गोपनीय सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मध्ययुगीन काळात मुस्लिम आक्रमकांनी अनेक हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध मंदिरे पाडली आणि मशिदी बांधल्या. या प्राचीन प्रार्थनास्थळांमध्ये अनेक देवी-देवतांचे अवशेष सापडतील. त्यांचा आदर केला पाहिजे आणि प्राचीन धार्मिक अवशेषांची काळजी घेण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
सर्वोच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण किंवा इतर कोणत्याही संस्थेला या मशिदींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जनहित याचिकात करण्यात आली आहे. सर्व्हे गोपनीय ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे. जर अवशेष सापडले तर जातीय द्वेष आणि धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार टाळता येतील. ही जनहित याचिका अधिवक्ता शुभम अवस्थी, अधिवक्ता विवेक नारायण शर्मा आणि सप्त ऋषी मिश्रा यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
याचिकेत म्हटले आहे की, बनारसच्या ज्ञानवापी मशीद परिसरात ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले आहे, तेथे मुस्लिम लोक वजू करतात. ही प्रथा अनेक दशकांपासून सुरू आहे. यात शिवलिंग आणि हिंदू देवतांचा द्वेष दिसून येतो. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने हे केले गेले. 100 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या प्रमुख मशिदींतील तलाव आणि विहिरींमधून वजू हलवण्याचे निर्देश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. वजू ही एक इस्लामिक प्रक्रिया आहे जी मशिदींमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शरीराचे अवयव स्वच्छ करण्यासाठी अनुसरली जाते.
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्याच्या दाव्यानंतर देशभरात विवादाचे वातावरण आहे. तसेच ताजमहालच्या 22 खोल्यांचे वर्णन तेजो महालय मंदिर करण्यात यावे असा वाद सुरू झाला आहे. तसेच कुतुबमिनार संकुलातील कुव्वातुल इस्लाम मशिदीत प्रार्थना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचबरोब मथुरा येथील जिल्हा न्यायालयाने श्रीकृष्णजन्मभूमी खटल्यातील याचिकेच्या सुनावणीस परवानगी दिल्यानंतर ते प्रकरणही तापत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, दिल्लीतील जामा मशिदीखाली देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा हिंदू महासभेने केला आहे.