इंटरनेट हे आता सर्व वयोगटांसाठी माहितीचा प्राथमिक स्रेत झालेला आहे. उदाहरणार्थ, कोणत्याही वैशिष्टय़पूर्ण औषधाची गरज नसलेल्या एखाद्या आजाराची साथ आल्याची माहिती इंटरनेटद्वारे पसरल्यास भावनाप्रधान जनतेमध्ये उन्मादाची (हिस्टेरिया) लाट निर्माण होऊ शकते आणि त्यातून प्रतिजैवकांचा गैरवापर होऊ शकतो.
चुकीच्या माहितीतून घेतल्या गेलेल्या प्रतिजैवकांमुळे उपचारास अत्यंत कठीण अशा जीवाणूंचा अर्थात ‘सुपरबग्ज’चा विकास होतो. फिजिशिअन्सना भेडसावणारी आणखी एक समस्या म्हणजे रुग्ण आणि त्यांची काळजी घेणारे नातेवाईक दिलेल्या औषधांच्या साइड-इफेक्ट्सबद्दल इंटरनेटवरून माहिती शोधतात. डॉक्टर्स लाभ विरुद्ध धोके यांचे गणित मांडूनच औषधे देतात; मात्र काही वेबसाइट्सवर साइड-इफेक्ट्स अतिशयोक्त स्वरूपात दिले जातात. त्यामुळे रुग्णांमध्ये भीती निर्माण होऊ शकते व त्यामुळे औषधे कोर्स पूर्ण होण्याआधीच बंद केली जातात आणि याचा परिणाम म्हणून प्रतिजैवकांना प्रतिकार तयार होतो किंवा एकंदर निष्पत्ती वाईट होते.
सामान्य जनतेला इंटरनेटद्वारे मिळणा-या अतिरिक्त माहितीमुळे स्वत:च डॉक्टर झाल्याची भावना येते आणि ते आजारी पडतात, तेव्हा त्यांना ज्यांची अजिबात गरज नाही अशी प्रतिजैवके घेतात. याचे सर्वाधिक आढळणारे उदाहरण म्हणजे, साधी सर्दी. साधी सर्दी हा बहुतेकवेळा विषाणूजन्य (व्हायरल) आजार असतो आणि तो स्वत:हून नियंत्रणात येतो, त्यासाठी प्रतिजैवकांची गरज नसते. तरीही त्यावर उपचार म्हणून अनेकदा प्रतिजैवके घेतली जातात, अगदी छोटय़ा बाळांनाही प्रतिजैवके दिली जातात. दुसरे उदाहरण आहे लघवीसाठी कॅथेटर्स लावलेल्या व ज्यांची घरीच काळजी घेतली जात आहे, अशा वयोवृद्ध लोकांचे. मूत्रमार्गाच्या प्रादुर्भावासाठी (यूटीआय) अनावश्यक चाचण्या केल्या जातात. त्यामुळे ‘असिम्प्टमॅटिक बॅक्टेरुरिया’ अर्थात प्रादुर्भावाची लक्षणे नसलेल्या जीवाणूंची उपस्थिती दिसून येते. अशा रुग्णांना प्रतिजैवकांची गरज नसते. पण, दुर्दैवाने अशा रुग्णांना तीव्र प्रतिजैवके दिली जातात.
दुर्दैवाने प्रतिजैवक प्रतिकारासाठी आता लिंगाचा किंवा वयाचा निकष उरलेला नाही; प्रतिजैवकांच्या चुकीच्या वापरामुळे छोटी मुले व वयोवृद्ध लोक सारख्याच प्रमाणात प्रतिजैवक प्रतिकारासह कम्युनिटी अक्वायर्ड इन्फेक्शन्सना बळी पडत आहेत, हा धोक्याचा इशारा आहे. जे रुग्ण गरज नसताना बेछूटपणे प्रतिजैवके घेतात किंवा जे रुग्ण सांगितलेल्या कालावधीच्या पूर्वीच प्रतिजैवके घेणे थांबवतात किंवा अन्य काही प्रकारे प्रतिजैवकांचा गैरवापर करतात, त्यांच्यावर उपचार करणे डॉक्टरांसाठी अत्यंत कठीण होऊन बसते. मग अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते, काहीवेळा इंट्राव्हेनस (आयव्ही) ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैवकांचे उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. बराच काळ रुग्णालयात ठेवून त्यांच्यावर उपचार करावे लागतात, त्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांवर खर्चाचा बोजा पडतो.