अमृतकण: “स्व’चा विसर

– अरुण गोखले

जीवनात काही गोष्टी ह्या मुद्दाम आठवणीत ठेवायच्या असतात. तर काही गोष्टी आठवणीने विसरायच्या असतात. पण हे विस्मरण माणसाला इतकंही होता कामा नये की त्याला “स्व’चाच विसर पडावा.
खरं तर मानव हा त्या देवाचंच रूप आहे. त्याचाच अंश आहे. त्या परब्रह्मरूपी बिंबाचे तो प्रतिबिंब आहे. पण होते काय की जन्माबरोबर नाळ कापली की त्याचे सोहं म्हणजेच तो मी आहे ह्याचे भान सुटते. जीव मी कोण? कोहं कोहं असं विचारीत फिरतो. त्या जीवाचे खऱ्या अर्थाने कल्याण करून त्याचा जन्म सार्थकी लावण्याचे, त्यास तो तूच आहेस.

तूच शिवरूप आहेस ही खरी ओळख सद्‌गुरूच करून देतात. ते हे कार्य ते कसे करतात ह्यासाठी एका सत्संगात महाराजांनी एक फार सुंदर गोष्ट सांगितली ती अशी- एकदा एक सिंहाचा छावा आपल्या कळपापासून चुकला. तो शेळ्या मेंढ्याच्या कळपात जाऊन मिसळला. त्यांच्या सहवासात राहू लागला.परिणामी तो स्वत:चा स्वभाव, स्वत:च्या ठायी असलेलं शौर्य, सामर्थ्य, गर्जना करण्याचीही क्षमता विसरला. तो त्या शेळ्या मेंढ्यांसारखाच भित्रा झाला. मे मे करीत त्यांच्यासोबत फिरू लागला.

एकदा त्या छाव्यास दुसऱ्या एका सिंहाने पाहिले. त्याने त्याची जातकुळी ओळखली. हा खरं तर सिंहाचा छावा आहे, पण हा “स्व’ विसरला आहे हे त्या दुसऱ्या सिंहाने ओळखले. त्या दुसऱ्या सिंहाने काय केले. तो पुढे गेला. सिंहाला पाहून शेळ्या मेढ्यांनी धूम ठोकली. हाही त्यांच्याबरोबर मे मे करीत धावत असताना त्या सिंहाने त्याला चपळाईने पकडले.

त्याचा कान धरला आणि त्यास घेऊन तो तलावाच्या काठी आला. त्याने त्या सिंहाच्या छाव्यास पाण्यातले त्याचे प्रतिबिंब दाखविले. त्या छाव्याने जेव्हा स्वत:चे ते रुबाबदार रूप पाहिले, त्याला “स्व’ सामर्थ्याची जाणीव झाली. तशी त्याने गर्जना केली. आपण सिंह आहोत ह्याची त्याला जाणीव झाली.

जीवाचंही अगदी त्या “स्व’चा विसर पडलेल्या छाव्यासारखं आहे. त्याला मीच ब्रह्म आहे अर्थात “अहं ब्रह्मास्मि’ ह्याचा विसर पडतो म्हणून तो उगाचच भटकत राहतो. कोहं कोहं विचारीत असतो. ते सोहंच विस्मरण सद्‌गुरू दूर करतात. तेच जीवास त्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.