मुंबई – मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना न्यायालयाने जामीन देण्यास पुन्हा नकार दिला आहे. अंमलबजावणी संचलनालयाने(ईडी)मलिकांच्या जामिनास विरोध केल्यानंतर कोर्टाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची आणखी वाढ केली आहे.
त्यामुळे आता नवाब मलिकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर मलिकांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. त्यानंतर आता उच्च न्यायालयानेही मलिकांची कोठडी कायम ठेवली आहे.
मुंबईच्या कुर्ला भागातील दाऊदच्या हस्तकांकडून मलिकांनी संपत्ती खरेदी केल्याचा आरोप ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. 20 वर्षांपूर्वी दाऊद इब्राहिमच्या हस्तक, त्याची बहिण हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी मूळ मालकाला धमकावून त्या जमिनीचा व्यवहार केला होता, असेही ईडीकडून सांगण्यात आले आहे.
नवाब मलिकांनी जमीन खरेदी करताना आधीच्या व्यवहारांची कोणतीही पडताळणी केलेली नव्हती, असाही आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मलिक जामीनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जाते.
मलिकांची किडनी निकामी- देसाई
गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांची एक किडनी निकामी झालेली आहे. सध्या त्यांचे शरीर एकाच किडनीवर काम करत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना ईडीकडून त्यांच्या डिस्चार्जसाठी घाई केली जात असल्याचा दावा मलिकांचे वकील अमित देसाई यांनी केला होता.
नवाब मलिक हे सध्या कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयामध्ये उपचार घेत असून त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. याशिवाय त्यांना उपचारासाठी दुसऱ्या मोठ्या रुग्णालयातही दाखल करण्यात येऊ शकते देसाई यांनी म्हटले आहे.