बळीराजाला आधार देण्यासाठी उद्यापासून शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर

मुंबई – राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालं आहे. आस्मानी संकटांमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्यासाठी आणि शेतकऱ्याला आधार देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार हे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.

शरद पवार हे उद्यापासून दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद भागात पाहणी करणार आहेत. ते 18 आणि 19 ऑक्टोबर असा दोन दिवस दौरा करणार आहेत.

महाराष्ट्रावर कोरोना महामारीचे संकट आहे. त्यातच आता अतिवृष्टीचे मोठे संकट कोसळले आहे. राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि वादळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस, कापूस, तांदूळ, सोयाबीनची पीकं हातातोंडाशी आली असताना अतिवृष्टीमुळे ती वाहून गेली. त्यामुळे महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शुक्रवारी अतिवृष्टी भागाचा आढावा घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

महाविकास आघाडी सरकाराने महाराष्ट्रातील बळीराज्याला वाऱ्यावर न सोडता लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.