मास्क कारवाई करणाऱ्या पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

दोघांना अटक : गणेशखिंड रस्त्यावरील घटना

Madhuvan

पुणे – मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर दुचाकी घातल्याचा धक्‍कादाय प्रकार घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली.

सौरभ लहु उमेर (वय 20, रा साईनगर, हिंगणे) आणि मयूर धनंजय चतुर (वय 26, रा हिंगणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई बालाजी बाबुराव पांढरे (वय 27) यांनी फिर्याद दिली.

पांढरे हे शिवाजीनगर वाहतूक शाखेत नेमणुकीला आहेत. शुक्रवारी ते वीर चाफेकर चौकात विनामास्क कारवाई करीत होते. त्यावेळी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सौरभ आणि मयूर दुचाकीवरून तेथे गेले. त्यावेळी त्यांनी मास्क घातला नसल्याने अडवून पांढरे यांनी पावती करण्यास सांगितले. तेव्हा आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून गाडीने धक्‍का मारून खाली पडले.

त्यानंतर पांढरे यांच्या पायावरून गाडी घालून दुखापत करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना पकडून अटक केली असून त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

शहरात पोलिसांकडून चौकाचौकात विनामास्क घालून फिरणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई सुरु आहे. अगदी नाकावरून थोडाजरी मास्क खाली आला असला तरी पोलीस विनामास्क कारवाई करीत असल्याने अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग पहायला मिळत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.