नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत महाराष्ट्रातील महिलेविषयी असत्य कथन केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला. एवढेच नव्हे तर, लोकसभेत शहांविरोधात हक्कभंगाची नोटीसही सादर केली.
शहा यांनी बुधवारी लोकसभेत अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी मोदी सरकारची बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी असणाऱ्या कलावती बांदूरकर यांचा उल्लेख करत कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल यांची राजकीय कारकीर्द लॉंच करण्यासाठी 13 अयशस्वी प्रयत्न झाले. त्यांनी कलावती नामक महिलेच्या वेदनांचे राजकारण केले. मात्र, त्या महिलेला घरकुल आणि विविध सरकारी योजनांचा लाभ मिळेल याची निश्चिती मोदी सरकारने केली, असे शहा म्हणाले.
मात्र, खोटे बोलून शहांनी संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला. तसेच, राहुल यांच्याकडून मदत मिळाल्याचा दावा करणारा कलावती यांचा व्हिडीओही सोशल मीडियावरून शेअर केला.
कलावती या यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शेतीविषयक समस्यांनी त्रस्त झालेल्या त्यांच्या पतीने आत्महत्या केली. त्यानंतर राहुल यांनी 2008 यावर्षी कलावती यांची भेट घेतली. आता पुन्हा बातम्यांचा विषय बनल्यानंतर कलावती यांनी राहुल यांनी घर बांधण्यासाठी मदत केल्याची कबुली दिली. तसेच, मोदी सरकारकडून कुठली मदत मिळाली नसल्याचाही दावा केला. त्याचा आधार घेऊन कॉंग्रेसने लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे शहा यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस सादर केली आहे.