मुख्य मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई
जेजुरी, दि. 29 (वार्ताहर) – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडकोटावर परंपरेनुसार विधिवत घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवास प्रारंभ करण्यात आला. नऊ दिवस बालद्वारी, रंगमहालात त्रिकाल सनई-चौघडा वादन, लोक कलावंताची हजेरी व त्यानंतर मर्दानी दसरा उत्सव व दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक खंडा (तलवार) स्पर्धा, मानकरी, खांदेकरी, लोककलावंत यांचे मानसन्मान होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.
जेजुरीच्या नवरात्र उत्सव व मर्दानी दसऱ्याचे ग्रामस्थ, खांदेकरी मानकरी तसेच राज्यातील विविध प्रांतातील भाविकांना मोठे आकर्षण असते. सालाबाद प्रमाणे रविवारी (दि. 29) मुख्य मंदिरातील पहाटेची पूजा झाल्यानंतर पाकाळणी (मुख्य मंदिराचा गाभारा, मूर्ती धुऊन स्वच्छ करणे, मूर्तींसह मार्तंड भैरवनाथ मूर्तींना नवे पोशाख परिधान करून विधिवत पूजा अभिषेक करणे) विधी करण्यात आला. माजी प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे यांचे वतीने मुख्य उत्सव मूर्तींसह मार्तंड भैरवनाथ मूर्तीला नवा पोशाख परिधान करण्यात आला. त्यानंतर घडशी समाज बाधवांच्या सनई चौघड्याच्या मंगलमय वाद्यांत उत्सव मूर्ती बालद्वारी-रंगमहालात आणण्यात आल्या.
वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांच्या वेदमंत्र पठणात विधिवत धार्मिक विधी करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील, खांदेकरी, मानकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, मुख्य पुजारी ओम बारभाई, माजी विश्वस्त संदीप घोणे, सेवेकरी जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, सागर प्रभाळे, सुधाकर मोरे, राजेंद्र मोरे, मिलिंद सातभाई, प्रशांत सातभाई, देवसंस्थानचे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, कर्मचारी, अधिकारी, सेवेकरी, पुजारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवांचे घट बसविल्यानंतर शहरातील मुख्य मानकरी, खांदेकरी व ग्रामस्थांच्या घराघरात घटस्थापना झाली.
नवरात्र उत्सव व मर्दानी दसरा उत्सवानिमित्त गडकोट आवार, मुख्य मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. “श्रीं’चा मुख्य गाभारा पाने, फुले, फळांनी सजविण्यात आला आहे. उत्सावामध्ये शहरातील युवकांच्या खंडा-तलवार कसरतींच्या सरावाला प्रारंभ झाला आहे.