बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना तिकीट देण्यात गैर काय? – राम माधव

नवी दिल्ली – भाजपचे जेष्ठ नेते राम माधव यांनी आज मध्यप्रदेशातील भोपाळ येथून २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना भाजपतर्फे लोकसभेचे तिकीट दिले गेल्याचे जोरदार समर्थन केले आहे. यावेळी बोलताना राम माधव यांनी सांगितले की, “युपीए सरकारच्या काळामध्ये हिंदू दहशतवाद ही जाणूनबुजून तयार करण्यात आलेली संज्ञा आहे. प्रत्यक्षात पहिले तर या देशामध्ये ना कधी हिंदू दहशतवाद होता ना आहे. काँग्रेसच्या काळामध्ये काही निष्पाप लोकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर केवळ बॉम्बस्फोटाचे आरोप असून ते सिद्ध झाले नसल्याने त्यांना लोकसभा निवडणुकांमध्ये तिकीट देण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही.”

तत्पूर्वी, काँग्रेसतर्फे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून आपले दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून भाजपतर्फे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आल्याने हा सामना अटीतटीचा ठरण्याची चिन्ह आहेत.

दरम्यान, केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार असताना दिग्विजय सिंह हे हिंदू-दहशतवादाविरोधात प्रकर्षाने मतं मांडणारे नेते म्हणून ओळखले जात असत. अशातच आता दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपाद्वारे प्रखर हिंदुत्ववादी मतप्रवाहातील मानल्या जाणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आल्याने प्रचार सभांमध्ये या दोन्ही उमेदवारांकडून कोणत्या मुद्द्यांवर मतं मागितली जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.