पुणे :– पुण्यातील उंड्री येथील महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी यांच्या वतीने ६७ व्या राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेचे आयोजन केले आहे. संपूर्णपणे काचेच्या महाराष्ट्र स्क्वॉश अकादमीच्या कोर्टवर येत्या ९ ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत १७ राज्यांमधील ३९१ खेळाडूंचा विक्रमी सहभाग असून १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात स्पर्धा होणार आहे.
इंडियन ऑईलने प्रायोजित केलेल्या या स्पर्धेसाठी ५० पंच व तितकेच स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेतील सहभाग निश्चित करणाऱ्या राज्यांमध्ये यजमान महाराष्ट्रासह आसाम, तमिळनाडू, सीबीएसई बोर्ड, आयबी बोर्ड, विद्या भारती, चंडीगड, झारखंड, आंध्र, दिल्ली, गोवा, छत्तीसगड, मणिपूर, तेलंगणा, आयपीएसई, मध्य प्रदेश व गुजरात यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष प्रदीर खांडरे यांनी सांगितले, की ही स्पर्धा प्रथमच पुण्यात होत असून काचेच्या कोर्टवर राष्ट्रीय स्पर्धा पहिल्यांदाच होणार आहे. ३९१ खेळाडूंचा विक्रमी सहभाग हेही स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. तीन सुसज्ज आणि संपूर्णपणे काचेची कोर्ट असलेली महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी ही चीनमधील हँगझोऊनंतर आशियातील केवळ दुसऱ्या क्रमांकाची अकादमी आहे.
लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्क्वॉशचा समावेश असून ही स्पर्धा काचेच्याच कोर्टवर खेळविली जाणार आहे, असे सांगून ते म्हणाले, की गुणवान खेळाडूंना कोवळ्या वयातच सर्वोत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर ते खेळाडू निश्चितच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील व चमकदार कामगिरीही बजावणार आहेत.
Auckland Classic 2024 : कोको गॉफ सलग दुसऱ्यांदा ठरली चॅम्पियन…
प्रत्येक राज्याच्या संघात मुले व मुलींच्या प्रत्येक वयोगटासाठी १० अशा एकूण ३० खेळाडूंसह तीन प्रशिक्षक व तीन व्यवस्थापक अशा एकूण ३६ सदस्यांचा समावेश आहे. स्पर्धेचे उद्घाटन १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या वेळी संयोजन समिती अध्यक्ष व पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देमुख व अर्जुनवीर कुस्तीगीर काका पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय पुण्याचे क्रीडा उपसंचालक दयानंद पवार, जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले, राज्य ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव महादेव कसगावडे व शिवाजी चंद्रकोळी, पुणे जिल्हा स्क्वॉश संघटनेचे सचिव आनंद लाहोटी, सतीश पोतदार, नकुल चव्हाण, संदीप पारेख, सुरेंद्र करवा व हृषिकेश बजाज आदी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.