पुणे – विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे व विद्यार्थ्यांना आपली सृजनशीलता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी नवी दिल्ली राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ५० वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन हे मंगळवार (दि. २६) पासून सुरू होणार आहे. सकाळी ११ वाजता शानदार उद्घाटन समारंभ होणार आहे.
या प्रदर्शनीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. दिनेश प्रसाद सकलानी आदीसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, प्रा. सुनिता फरक्या आदींनी पत्रकार परिषदेत राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीबाबत माहिती दिली. यावेळी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, विद्या प्राधिकरणातील उपसंचालक रमाकांत काठमोरे, डॉ. कमलादेवी आवटे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी, असा निश्चित केला आहे. सामाजिक, पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण सात उपविषय निर्धारित केलेले आहेत. यात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नवोपक्रम, पर्यावरणीय चिंता, वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास, आमच्यासाठी गणित, नियोजन व स्वरूप यांचा समावेश आहे.
संपूर्ण देशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, विविध भागधारक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती या प्रदर्शनीस भेट देणार आहेत. २०० स्टॉल मांडले जाणार आहेत. या व्यतिरिक्त नवीन शैक्षणिक विचार प्रवाह, यशोगाथा व यशस्वी उपक्रम यासाठी राज्यातून निवडक २५ स्टॉलसाठी विविध शासकीय व स्वयंसेवी संस्था यांना सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. या प्रदर्शनीमध्ये सायन्स टॉक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आकाश निरीक्षण करण्याची संधीसुद्धा सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. महाराष्ट्र राज्याची संस्कृती व परंपरा इतर राज्यातील विद्यार्थ्यांना कळावी या हेतूने महाराष्ट्र कॉर्नर सुद्धा मांडण्यात येणार आहे. ३० डिसेंबरला शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना पुणे परिसरातील विज्ञान संस्थाना भेट देण्याचे व मेट्रोची सफर घडवून आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
विविध स्पर्धांचे आयोजन…
राज्यातील सर्व मुलांना या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनीचा अनुभव यावा व नावीन्यपूर्ण विज्ञान प्रयोगांची माहिती व्हावी यासाठी संपूर्ण कार्यक्रमाचे यु-ट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रदर्शनीच्या मुख्य विषयाला अनुसरून चित्रकला, निबंध लेखन, वैज्ञानिक रांगोळी, पोस्टर मेकिंग स्पर्धा, अशा विविध स्पर्धा आयोजित करण्याविषयी निर्देश देण्यात आले आहेत.