नाशिक – नाशिक महापालिकेने महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट उभारला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. महापालिकेकडे केवळ 13 मेट्रीक टन ऑक्सिजनची क्षमता होती. मात्र, आता पालिकेने तब्बल 3 कोटी रुपये खर्चून 140 मेट्रीक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारल्याची माहिती त्यांनी एका मराठी वाहिनीशी बोलताना दिली. यामुळे सबंध उत्तर महाराष्ट्राची चिंता मिटल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
नाशिकमध्ये करोनाचा पुन्हा एकदा विस्फोट झाला असून, बाधितांची संख्या चक्क पाच हजारांच्या पुढे गेली आहे. त्यात सर्वाधिक बाधित नाशिक महापालिका क्षेत्रात 3 हजार 955 आहेत. सोबत निफाड, दिंडोरी आणि सिन्नरमध्येही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 735 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थितीत 5 हजार 344 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. ऑक्सिजनविना अनेकांचे प्राण गेले. हेच ध्यानात घेऊन नाशिक महापालिकेने ऑक्सिजनमध्ये आत्मनिर्भर होण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.