Ajit Pawar Nashik Tour : राज्यात एकीकडे कांद्याचा प्रश्न (Onion Issue) तीव्र होत असतानाच आता टोमॅटोच्या दराने (Tomato rate) डोके वर काढले आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक (NashiK) जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर असताना त्याठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा दिंडोरी-कळवण रस्त्यावर अडविण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.
आक्रमक शेतकऱ्यांना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ताब्यात घेतले आहे. मात्र काही काळ रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. शेतकऱ्यांनी थेट टोमॅटो कांदे रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध नोंदविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिक दौऱ्यावर आले असून ओझर विमातळावरून दिंडोरीकडे जात असताना कळवण (Kalwan) दिंडोरी रोडवर त्यांचा ताफा अडविण्यात आला.
शेतकऱ्यांनी ताफ्याच्या समोरच टोमॅटो,कांदे फेकत अजित पवारांचे लक्ष वेधले. शिवाय शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत, मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
कांदा निर्यात शुल्क मागे, टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतकऱ्यांनी जगायचं कस, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला.