Narsing Udgirkar। लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षाकडून याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सुरुवातीला मविआ सोबत जाणार असल्याच्या चर्चा असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने देखील आपली दुसरी यादी काल जाहीर केली. मात्र या यादीने अनेक ठिकाणांवर वंचितने मविआची डोकेदुखी करून ठेवलीय. यामध्ये मराठवाड्यतील महत्वाच्या लातूर मतदार संघात वंचितने टेन्शन वाढवलंय.
वंचित बहुजन आघाडीने नुकतेच 11 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या पक्षाने माढा, सोलापूर यासारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांत आपले उमेदवार दिलेत. तर पक्षाने नरसिंग उदगीरकर यांना देखील तिकीट दिले आहे. उदगीरकर यांच्या उमेदवारीमुळे लातूरची लढत आता तिरंगी होणारआहे. त्यांच्या या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसू शकते. सध्या या जागेवर भाजपचा खासदार आहे.
वंचितकडून नरसिंग उदगीरकरांना तिकीट Narsing Udgirkar।
लातूर जिल्ह्यासाठी वंचित बहुजन आघाडीनेदेखील या जागेवर आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला असून या पक्षाने येथे नरसिंग उदगीरकर यांना तिकीट दिले आहे. ते मुळचे उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथील रहिवाशी आहेत. लातूर हा राखीव लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना आता वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीचे तिकीट दिलंय.
2019 साली वंचितला 1 लाख 12 हजार मते Narsing Udgirkar।
उदगीरकर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकपदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. निवृत्ती घेतल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले होते. यावेळी वंचितने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. दरम्यान 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने येथून राम गारकर यांना तिकीट दिले होते. त्यांना एकूण एक लाख 12 हजार मते मिळाली होती. लातूरची ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. वंचितने या जागेवर उमेदवार उभा केल्यामुळे मतफुटी होण्याची शक्यता आहे. ज्याचा फटका मविआच्या उमेदवाराला बसू शकतो.