सातारा -सातारा नगरपालिकेत शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील यांना सोमवारी मारहाण झाल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात ठेकेदारासह सहा जणांविरुध्द दरोड्याची तक्रार दिली. संशयितांनी खिशातील 4700 रुपये जबरदस्तीने काढून मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, बदनामीच्या उद्देशाने जाणीवपूर्वक मारहाणीचे शुटींगही केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गणेश पवार, अनिरुध्द शिंदे, ओमकार शिंदे, व अनोळखी तिघे (तक्रारदार यांना संशयितांची पूर्ण नावे, पत्ते माहिती नाहीत) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नरेंद्र मोहनराव पाटील (वय 55, रा.सदरबझार) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी सकाळी नरेंद्र पाटील नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंताच्या केबिनमध्ये बसले होते. यावेळी संशयित तेथे आले व त्यांनी दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देऊन हाताने मारहाण केली.
मारहाण होत असताना संशयितांनी तक्रारदार यांच्या शर्टच्या खिशातील 4700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. हा सर्व प्रकार घडताना संशयितांनी बदनामी करण्याच्या उद्देशाने शुटींग केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर सचिन बनसोडे यांनी नरेंद्र पाटील यांच्याविरुध्द खंडणी व ऍट्रॉसिटीची तक्रार दिली. पोलिस ठाण्यासमोर दोन्ही विरोधी गट आल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, सोमवारी रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. दरोडा टाकून पैसे लुटून मारहाण केल्याची तक्रार मंगळवारी सकाळी नरेंद्र पाटील यांनी पोलिसात दाखल केली. या तक्रारीवरुन ठेकेदारासह इतर संशयितांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.