नवी दिल्ली : गेली पाच वर्ष देश आर्थिक आपत्तीकडे वाटचाल करत आहे. मात्र त्याला केवळ स्थैर्य देण्याचेच नव्हे तर त्यात शिस्त आणण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे उद्दीष्ट ठेवले. हा आकडा काही अचानक आलेला नाही. पाच वर्षात हे उद्दीष्ट गाठण्याची देशाची क्षमता आहे, यावर ठाम विश्वास असाल्यानेच ते उद्दिष्ट ठरवण्यात आले, असेही पंतप्रधान म्हणाले.
असोचॅमच्या शताब्दी कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहोळ्यात मोदी बोलत होते. ते म्हणाले, अर्थव्यवस्थेचे हे उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रत्येक गटाने कार्यरत व्हायला हवे. याबाबातची चर्चा खुपच सकारात्मक होत आहे. शेवटी उद्दीष्ट पूर्ण केल्याचे श्रेय जनतेलाच जाते. ते सरकारचे नसते.
गेली पाच वर्ष अर्थव्यवस्था आपत्तीकडे जात आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी उपाय योजना सुरू आहेत. सुमारे सहा वर्षापुर्वी देशाची वाटचाल आपत्तीकडे जाण्यास सुरवात झाली. त्याला केवळ स्थैर्य देण्याचे काम आमच्या सरकारने केले असे नव्हे तर त्यात शिस्त आणण्याचाही प्रयत्न केला.
आम्ही दशकभर मागणी होत असलेल्या उद्योग जगताच्या गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष दिले. आपले सरकार 2014 मध्ये आल्यानंतर व्यवसाय करणे अधिक सुखकर बनले. देशात उद्योजकांना व्यवसाय करणे अधिक सुकर व्हावे याकडे आमच्या सरकारने लक्ष दिले, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
तुम्ही तुमचा व्यवसाय दिवस रात्र कष्ट करून वाढवत असता. त्यावेळी त्याला धोरणांची साथ सुरवातीपासून मिळायला हवी. त्यादृष्टीने आम्ही पावले टाकली. आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी सहज व्यवसाय करण्यास योग्य देशांच्या यादीत देशाचा क्र. 190 देशांत 142वा होता, केवळ तीन वर्षात आम्ही 62 व्या क्रमांकावर मजल मारली, असे पंतप्रधान म्हणाले.
अर्थव्यवस्थेशी संबंधित सर्व गोष्टी आम्ही नियमित करण्याचा प्रयत्न केला. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिकता आणून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न करत आहोत. पारदर्शकता, क्षमता आणि उत्तरदायित्व आणून चेहराहीन कर प्रशासन आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
उद्योग जगतानेही पारदर्शकता बाणवली पाहिजे. मात्र, 70 वर्षाची सवय जाण्यास वेळ लागेल. आता कंपनीची नोंदणी काही तासात होते. त्याला आटवडे लागत नाहीत. स्वयंचलीत यंत्रणांच्या सहाय्याने सीमेबाहेरील व्यापार वेगवान बनवला. मुलभूत सेवा जोडून विमानतळ आणि बंदरांवर खर्च होणाऱ्या वेळात कपात केली.