नवी दिल्ली: झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल हेमंत सोरेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. मोदींनी राज्याच्या विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहिले, “झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल हेमंत सोरेन जी यांचे अभिनंदन. झारखंडच्या विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देतो.” 44 वर्षीय आदिवासी नेत्याने रविवारी झारखंडच्या 11 वा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
हेमंत सोरेन यांच्यासमवेत तीन मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये कॉंग्रेसचे दोन आणि आरजेडीचे एक सदस्य आहेत. शपथविधी सोहळ्यात विरोधी एकतेची झलक देखील दिसून आली. शपथविधी सोहळ्यात राहुल गांधी, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, सीताराम येचुरी, डी राजा, द्रमुकचे नेते स्टालिन, अशोक गहलोत आणि आपचे नेते यांच्यासह अनेक विरोधी नेते व्यासपीठावर दिसले.
झारखंडमध्ये भाजप सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले असून राज्यात एक युती सरकार स्थापन करण्यात आले आहे. झामुमो, कॉंग्रेस आणि आरजेडी यांनी एकत्र निवडणुका लढवल्या आणि जबरदस्त विजय नोंदविला. झारखंडचे राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज शपथ दिली. त्यांच्यासमवेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर ओरावण, कॉंग्रेसचे विधानसभेचे नेते आमदार आलमगीर आलम आणि राजदचे आमदार सत्यनंद भोक्ता यांनीही कॅबिनेट मंत्र्यांची शपथ घेतली.