नंदूरबार – येथील शहादा तालुक्यातील किमया युवराज राठोड (वय 13) या मुलीने 30 मिनीटे 16 सेकंद शीर्षासन करून विक्रम केल्याने तिची वंडर बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. विक्रमाची नोंद झाल्याचे पत्र, स्मृतीचिन्ह, मेडल व प्रशस्तीपत्र कमियाला मिळाले आहे.
करोनाकाळात घरीच तिने सराव करून हा विक्रम केला. तिने टीव्हीवरील “करोनासे जंग बाबा रामदेव के संग” हा कार्यक्रम बघून तसेच यु ट्यूबवरील व्हिडीओच्या सहाय्याने योगासनांचा सराव केला. तिला शीर्षासनची आवड निर्माण झाली. सुरुवातीला ती एक मिनीटापर्यंत शीर्षासन करत असे. मात्र नंतर सहा महिने सतत सराव करून तीने 30 मिनीटे 16 सेकंद शीर्षासन करून विक्रम केला. या दरम्यान तिला आई-वडिल व भावाचे मार्गदर्शन लाभले.
किमयाला योगासनांबरोबरच, चित्रकला, हस्ताक्षर, गायन, वक्तृत्व, नृत्य, क्रीडा या स्पर्धांमध्ये आवड आहे. ती नृत्यदिग्दर्शनही करते. पुढे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड करण्याचा तिचा मानस असल्याचे ती सांगते. वसंतराव नाईक उच्च माध्य. विद्यालय शहादा येथील क्रीडा संचालक वाय. एस. राठोड यांची ती मुलगी आहे.