नागठाणे, (प्रतिनिधी) – वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर नागठाणे (ता. सातारा) ग्रामपंचायतीने करवसुली मोहीम तीव्र केली असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली.
नागठाणे ही सातारा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. येथे मोठी बाजारपेठ आहे. परंतु येथील निवासी व व्यावसायिक मिळकतदारांची घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढतच आहे. त्यामुळे विकासकामांवर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
म्हणुन ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांच्या मासिक बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून थकबाकीदारांकडून करवसुली करण्यासाठी धडक मोहीम राबविण्याचे ठरवण्यात आले.
त्या मोहीमे अंतर्गत सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, विस्तार अधिकारी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागठाणे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य यांच्या सुचनेनुसार ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने थकबाकीदारांची नळ जोडणी बंद करण्याची व गाळेधारकांचे गाळे सील करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
नागठाणे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व थकबाकीदार मिळकतदारांनी आपली थकित कराची रक्कम तात्काळ ग्रामपंचायतीकडे भरणा करुन कटू कारवाई टाळावी, असे आवाहन विद्यमान सरपंच सौ. रूपाली बेंद्रे, उपसरपंच अनिल साळुंखे व सदस्यांनी केले आहे.