पॅरिस -विद्यमान विम्बल्डन चॅम्पियन एलेना रायबाकिना हिने शनिवारी तिसऱ्या फेरीच्या सामन्यापूर्वी फ्रेंच ओपनमधून माघार घेतली. एलेना आजारी पडल्यामुळे ती स्पर्धेत खेळू शकणार नाही. चौथ्या मानांकित रायबाकिनाचा सामना कोर्ट फिलीप चॅटियरवरील दिवसाच्या पहिल्या स्पर्धेत 132 व्या मानांकित सारा सोरिबेस टोर्मोशी होणार होता.
मी या स्पर्धेत 100 टक्के कामगिरीच्या ध्येयाने उतरले होते. मात्र, माझा फिटनेस माझ्या आजारपणामुळे ढासळला असल्याने, या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून मला माघार घ्यावी लागत आहे, असे रायबाकिना म्हणाली.
दुसरीकडे, क्ले कोर्टचा बादशहा मानला जाणारा 37 वर्षीय राफेल नादालही यावर्षीच्या स्पर्धेपासून दूर आहे. राफेल नदालच्या दुखापत झालेल्या डाव्या हिप फ्लेक्सरवर शुक्रवारी आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया झाली.
2005 च्या स्पर्धेत पदार्पणासह त्याने विक्रमी 14 विजेतेपद जिंकल्यानंतर त्याला प्रथमच फ्रेंच ओपनमधून बाहेर पडावे लागले आहे. नदालचे प्रवक्ते बेनिटो पेरेझ-बार्बाडिलो यांनी सांगितले की, बार्सिलोनामध्ये होत असलेल्या शस्त्रक्रियेत तीन डॉक्टरांचा सहभाग होता. सध्या तरी त्याला पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार आहे.