नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुरघोड्या होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच नुकतेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी हल्लाबोल करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसत आहे. ‘आपला स्वाभिमान दुखावला गेला, त्यामुळंच मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला’, असे म्हणत शेट्टर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
शेट्टर यांनी नुकतेच भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला, एका वृत्तसंस्थेशी बोलताना जगदीश शेट्टर म्हणाले, यापूर्वी भाजपतर्फे हुबळी-धारवाड मतदारसंघातून अनेकांनी निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा इथं पराभव झाला. मी पक्षाला इथं विजय मिळवून दिला. 1994 मध्ये मी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर सतत मी निवडणूक जिंकत आहे, त्यामुळंच लोकांचा माझ्यावरचा विश्वास वाढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिकीट न देणं हा माझा अपमान आणि स्वाभिमान दुखावणारा असल्याचं जगदीश शेट्टर म्हणाले. मी त्यांना (भाजप) आव्हान देतोय. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मी माझ्या मूळ मतदारसंघातील हुबळी-धारवाड मतदारसंघात गेलोय. लोकांनी इथं माझं जोरदार स्वागत केलंय, असे त्यांनी यावेळी सांगितले.
माजी मुख्यमंत्री शेट्टार म्हणाले, मला काँग्रेस पक्षाकडून इतका सन्मान मिळेल, असं कधीच वाटलं नव्हतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतरांनी मला काँग्रेसकडून नेहमीच सन्मान मिळेल, असं आश्वासन दिलंय. मला फक्त आदर हवा आहे. मला सत्तेची भूक नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, जगदीश शेट्टर हे 2023 ची कर्नाटक निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून लढणार आहेत.