सातारा : साताऱ्यात सध्या एका जमिनीच्या भूमिपूजनावरून वातावरण पूर्णपणे तापले आहे. शहरातील शिवराज पेट्रोल पंपानजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्याच उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला आहे. आज दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचा भूमिपूजन होणार होते. मात्र त्याअगोदरच याठिकाणी मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सकाळी ९ वाजता अचानक शिवराज पेट्रोल पंपानजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच्या भूमिपूजन करण्याच्या कार्यक्रम स्थळावर कार्यकर्त्यांसमवेत येऊन कार्यक्रम उधळून लावला. या ठिकाणी असलेले साहित्य फेकून दिले, एवढंच तर कंटेनरही पलटी केला. त्यामुळे दोन्ही राजेंमधील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, “माझ्या प्रॉपर्टीत कोणी पाय ठेवायचा नाही. माझ्या प्रॉपर्टीत कोणी गेल्यास त्यांच्यावर ट्रेसपासिंगची केस ठोकणार. तुम्ही सगळ्यांना नीट समजावून सांगा भांडण झाली तर मोठी होतील” असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलिसांना खिंडवाडीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर केले आहे. दरम्यान ‘हे कोणत्या टोकाला जाईल मी सांगू शकत नाही’ असा इशारा देखील उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
अशातच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घटनास्थळी पोहचून या जागेचे भूमिपूजन केले आहे. त्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचे दिसून आले. पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या प्रकारानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामुळे साताऱ्यात दोन्ही राजेंमधला वाद पुन्हा उफाळून आला.