पुणे – शिरूर येथील रामलिंग देवस्थानाचा जीर्णोद्धार असो, किंवा वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार. भगवान शंकर हे धारिवाल कुटुंबाचे श्रद्धास्थान राहिले आहे, अशी भावना आरएमडी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष शोभाताई आर. धारिवाल यांनी व्यक्त केल्या.
येथील जागृत देवस्थान श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे लोकार्पण, तसेच रसिकशेठ धारिवाल सभामंडप, मंदिर विद्युत रोषणाई संच उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, आरएमडी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा ऑक्सिरिच ड्रिंकिंग वॉटरच्या संचालक जान्हवी धारिवाल- बालन, इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक पुनीत बालन, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी नगरसेवक श्रीकांत शिरोळे, दत्ता बहिरट, नीलिमा खाडे, बाळासाहेब बोडके, सौ. जोत्स्ना एकबोटे, माजी न्यायधीश व अध्यक्ष ग्राहक संरक्षण मंच ऍड. शरदराव मडके, आर्किटेक्ट शिरीष केंभावी, हनुमंत बहिरट पाटील, सुधीर दुर्गे, शशिकांत भोसले, महेश दुर्गे, संजय सातपुते इत्यादी विश्वस्त उपस्थित होते.
शोभाताई धारिवाल म्हणाल्या, “या मंदिराचे वेगळे महत्त्व आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवलिंगाचे आशीर्वाद घेऊन शाहिस्तेखानावर चढाई केली होती. त्याला पुण्याबाहेर हुसकावून लावले होते. तसेच नदीकाठी अहिल्याबाई होळकरांनी घाट बांधला होता. मात्र, नंतरच्या काळात हे मंदिर दुर्लक्षित झाले होते. त्या मंदिराचे पावित्र राखण्यासाठी आरएमडी फाउंडेशनच्या निधीतून जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण झाले, याचा फार आनंद होत आहे.’
अजित पवार म्हणाले, “मराठ्यांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्काम केलेल्या ऐतिहासिक स्वयंभू शिवमंदिराचे जीर्णोद्धार केल्याने आपल्या अनेक पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील. आरएमडी फाउंडेशनचे हे काम गौरवास्पद आहे. फाउंडेशनचे सामाजिक कार्यदेखील कौतुकास्पद आहे.’
कार्यक्रमाचे प्रास्तविक हनुमंत बहिरट पाटील यांनी, सूत्रसंचालन संजय सातपुते तर आभार सुधीर दुर्गे यांनी मानले.