पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे ः भोर पोलिसांची दिल्लीत कारवाई
भोर – भोर शहरात सावत्र आईची धारदार शस्त्राने आणि डोक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या आरोपी शिवम अकुंश शिंदे याला नवी दिल्लीतून गुरूवारी (दि. 21) भोर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेऊन गजाआड केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भोर येथील रेश्मा शिंदे (वय 36, रा. बाजारवाडी, ता. भोर) हिच्याबरोबर आरोपीचे वडील अंकुश शिंदे यांनी दुसरे लग्न केले होते. या कारणावरून अंकुश शिंदे याच्या पहिल्या मयत पत्नीचा मुलगा शिवम अंकुश शिंदे (वय 21) याने रेश्मा शिंदेची हत्या केली होता. त्याबाबत भोर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे करीत असून आरोपी शिवम हा वेगवेगळ्या शहरात फिरत असल्याचे समजले.
आतापर्यंत तो कोल्हापूर, आंध्रप्रदेश, तिरुपती, तेलंगना, ओरिसा, मुंबई, मध्यप्रदेश, हरियाना अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पोलिसांना गुंगारा देत होता. तो दिल्ली येथे एका मिठाईच्या दुकानात गेल्या तीन दिवसांपासून पार्सल पोहचवण्याचे काम करीत असल्याचे समजल्याने गुरुवारी (दि. 21) दिल्लीतून भोर पोलिसांनी त्याला 23 दिवसांनंतर बेड्या ठोकल्या.
भोर पोलीस स्टेशनला त्यास हजर केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यास भोर कोर्टात त्याला चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.