पिंपरी -पती पत्नीच्या भांडणानंतर पत्नीला धडा शिकविण्यासाठी पतीने आपल्या पाच महिन्याच्या मुलीचे नाक तोंड दाबून हत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. जन्मदात्या बापानेच हे कृत्य करून बनाव करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसी खाक्या दाखविताच दुर्देवी मुलीच्या वडीलाने खुनाची कबुली दिली. ही घटना बावधन येथे शनिवारी (दि. 9) पहाटे उघडकीस आली.
संगिता बापूराव जाधव (वय पाच महिने) असे खून झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. बापूराव नामदेव जाधव (वय 35, सध्या रा. हनुमंत दगडे चाळ, बावधन, पुणे. मूळगाव मु.पो. शिकारा, ता. मुखेड, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पित्याचे नाव आहे. जोताबाई बापूराव जाधव (वय 25) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापूराव हा टेम्पोचालक असून त्याचा हा दुसरा विवाह आहे. काही दिवसांपासून त्याचे आपली पत्नी जोताबाई हिच्याशी कौटूंबिक कारणावरून भांडण सुरू आहे.
शुक्रवारी रात्रीही त्यांच्यात भांडण झाले. पत्नीला धडा शिकविण्यासाठी त्याने शनिवारी पहाटे पावणे तीनच्या सुमारास आपली पाच महिन्यांची मुलगी संगिता हिचे नाक तोंड दाबून हत्या केली. व त्यानंतर तिचा मृतदेह घराजवळील मोकळ्या जागेत टाकून दिला.
पहाटे पावणे सहाच्या सुमारास त्याने आपली पत्नी जोताबाई हिला झोपेतून उठविले. मुलगी संगिता कोठे आहे, अशी विचारणा केली. मुलगी घरात नसल्याचे दिसताच त्या दोघांनी तिचा आसपास शोध घेण्याचा प्रयत्न केला. घरापासून काही अंतरावर कुत्री भुंकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीचा मृतदेह पाहून तिच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. बापूराव याने याबाबत बावधन चौकीला जाऊन घटनेबाबत माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अधिक माहिती घेण्यासाठी बापूराव यांच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे देत बनाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रश्नांची सरबती करत पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपणच संगिताचा खून केल्याची कबुली दिली. सहाय्यक निरीक्षक आनंद पगारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.