पुणे- मानसिक त्रास देणाऱ्या प्रेयसीचा खून करून तिचे तुकडे करत वेगवेगळ्या ठिकाणी टाकणाऱ्या प्रियकरास खंडणी विरोध पथकाने जेरबंद केले आहे. त्याने गळा आवळून खून केल्यावर तिचे शीर व हात-पाय कापून वेगवेगळे केले. यानंतर हे तुकडे पोत्यात भरून लवासा घाट परिसरात ठिकठिकाणी टाकून दिले होते.
रोझिना रियाज पानसरे ऊर्फ कविता चौधरी (वय 31, रा.बुधवार पेठ) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तर हनुमंत शिंदे (रा. बुधवार पेठ, पुणे) याला खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोझिना 10 ते 12 दिवसांपासून बेपत्ता असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. फरासखाना पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल असून तिचे हनुमंत शिंदे याच्या सोबत अनैतिक संबध होते. त्यानुसार शिंदे याला ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्याने सांगितले की, रोझिना हिला सदनिका भाड्याने घेऊन दिली होती. तो तिच्याकडे अधूनमधून जात-येत असे. मात्र, विवाह झाला असल्याने तो आपल्या कुटुुंबाकडे घरी जात असे, ही गोष्ट रोझिनाला खटकत होती, यातून दोघात वाद होत होते. तिने 12 ऑगस्टला तू दिवसभर का घरी आला नाहीस, असे बोलून वाद केला व शिवीगाळ केली. त्यावेळी तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर सदनिका बंद करून अक्कलकोट येथे निघून गेलो. 14 ऑगस्टला रात्री मित्राचा छोटा टेम्पो घेऊन आल्यानंतर सदनिकेत धारदार शस्त्राने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ताडपत्रीच्या पिशवीत भरून भूगाव ते लवासा घाट परिसरात टाकून दिले.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात हनुमंत शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे याचा बुधवार पेठेतच मोबाइल रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. तेथेच तो कुटुंबासोबत राहात होता. त्याला पत्नी व दोन मुले आहेत. सदरची कारवाई सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे आदींच्या
पथकाने केली.